Friday, March 22, 2013

पत्र पाचवे:अनिश्चिततेचे घटक




दौरा फक्त पाच दिवसांवर आहे. नियोजनावर शेवटचा हात फिरवताना मला अचानक २००१-०२ मध्ये काम करणार्या माझी आठवण झाली. कारण होते, राजौरी-पुलवामा भागांमधून येणाऱ्या काही बातम्यांचे. दहा वर्षांपूर्वी जेव्हा मी काश्मीरला जायचे निश्चित करायचो तेव्हा खरेतर अशा काही गोष्टी चालू असतील तर जावे किंवा न जावे असा प्रश्न पडायचा. वाटायचे की आपल्यावर सतत कोणीतरी लक्ष ठेवून आहे...अर्थात हे सगळे विचार बाजूला सारून मी जायचो आणि प्रत्येक वेळी नवीन काहीतरी शिकून परतायचो. आजचा विचार केला तर अशी अनिश्चितता मला वाटत नाही. कारण तेव्हा जाणवणारी अनिश्चितता ही 'अनामिका' ची होती, आणि आज त्या 'अनामिका'ला ओळख आहे! हा प्रवासही मोठा विलक्षण आहे. अनेक जण काश्मीरच्या अनिश्चिततेचे घटक आहेत-टाळता न येण्याजोगे.या मधल्या काळात अनेक धडपडी करून त्यांना भेटलो, त्यांच्याशी बोललो. त्यामुळे आज त्या विविध अनामिकांना नावं, चेहरे आणि विचार आहेत. त्यांचे विरोधाचे मुद्दे, पद्धती, विचार याही माहिती झाल्या आहेत. त्यामुळेच आधीसारखी अनिश्चितता आज वाटत नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की जाणवते, की दहा वर्षांपूर्वी minimum risk ची मक्तेदारी फक्त माझीच होती आणि आज त्या minimum risk मध्ये अजून १०-१२-१५ वाटेकरी आहेत; आणि ही वाढलेली जबाबदारी माझी आहे.

जबाबदारी वाढली की माणसाला समज येते, दुसऱ्या भाषेत प्रौढत्व येतं. पण हे प्रौढत्व कामामधून त्याचा प्राण काढून टाकणारे-अकाली तर नाही ना अशी शंका वाटते. प्रत्येक कामाच्या चार फेजेस असतात.

Concept phase 
Growth phase 
Maturity phase 
Decline phase 

पहिल्या दोन अवस्थांमध्ये कामामध्ये सर्वाधिक गरज असते ती पॅशन आणि exploration ची; नवीन कल्पना, नवीन पद्धती शिकण्याची, समजून घेण्याची आणि बेधडक, बेफिकीर 'नव्या' चा शोध घेण्याची. मॅच्युरिटी फेज मध्ये कामाच्या स्थिरतेचा विचार होतो. आणि म्हणूनच त्याला प्रतिकूल असणारे सर्व घटक, सर्व संभाव्य धोके कमी करण्याचा प्रयत्न होतो. परंतु स्थिरतेमधूनच साचलेपणा येण्याची शक्यता असते. कामामधली पॅशन, इनोव्हेशन हरवून जाण्याची शक्यता असते; आणि मग उरतात त्या फक्त यांत्रिक गोष्टी. कामामधून या गोष्टी जाणं म्हणजेच कामाचा प्राण निघून जाणं; मग साहजिकच चौथ्या आणि शेवटच्या अवस्थेकडे वाटचाल सुरू होते- decline.

काश्मीरचं काम पहिल्या दोन अवस्थांमधून आता तिसर्या अवस्थेपर्यंत पोहोचत आहे. याच वेळी मला ती पहिली पॅशन हरवल्याची जाणीवही होते आहे. कारण risk minimize करताना नवीन धोके पत्करण्याची तयारी दाखवता येत नाही आणि मग नवीन काही गवसतच नाही. याआधी मी काश्मीरला जायचो तेव्हा प्रत्येक वेळी किमान एका नवीन माणसाला भेटायचो, जोडायचो. आताही मी नवीन माणसांना भेटतो पण आता भेटणारा नवीन माणूसही ओळखीतून आलेला असतो; मी जोडलेला नाही म्हणूनच शंका येते की स्थिरतेच्या नावाखाली माझ्यामधली आव्हाने पेलण्याची ताकद आणि ऊर्मी कमी होते आहे. अर्थात काश्मीरचे काम हे फक्त पॅशन वर चालू शकत नाही. ते तसे असते तर आधीच बंद पडले असते.

दुसरे म्हणजे गटाचे अनुभवविश्व आणि कमिटमेंट. गट 'ground zero situation' समजून घेण्यापासून आणि त्या प्रत्यक्ष अनुभवांपासून खूप दूर आहे. अशा प्रकारचे नवीन आणि बेधडक अनुभव मी घेतले म्हणूनच माझी अस्मिता, माझ्या भावना, माझी स्वप्नं, माझा विश्वास काश्मीरशी जोडला गेला. पण माझ्यामधल्या या १००% भावना नवीन गटामध्ये जशाच्या तशा १००% उतरवणार कशा? पुढे-पुढे जाताना त्या हळूहळू कमी कमी तीव्र होत जाणे ओघानेच आले. म्हणूनच प्रत्येकाने असे अनुभव घेऊन ग्राऊंड झिरो समजून घ्यावे, कारण तरच कामावर १००% विश्वास आणि कामासाठी १००% पॅशनेट असलेले कार्यकर्ते मिळतील. असे कार्यकर्ते का गरजेचे?तर काश्मीरचे काम हे प्रत्यक्ष परिस्थितीला हात घालणारे काम आहे. इथे पदोपदी निराशा आणि अविश्वासाचा सामना करावा लागतो-तोही दोन्हीकडचा-काश्मीरच्या लोकांच्या परिस्थितीकीय चौकटीमुळे त्यांचा आणि ऊर्वरीत भारताच्या पुस्तकी चौकटीमुळे त्यांचाही. म्हणूनच जो काही विचार घेऊन काम सुरू करणे आहे ते 'माझी गरज' म्हणून. मग हळूहळू दोघांनाही ती गरज आपली वाटेल आणि शेवटी त्या गरजेचे काश्मीरच्या गरजेत रूपांतर होईल. ही प्रक्रीया सोपी नाही आणि सहजही नाही. या वाटेवर फुलांपेक्षा काटेच जास्त आहेत. म्हणून काश्मीरचा कार्यकर्ता हा १००% निष्ठावान, स्वत:च्या कामावर १००% विश्वास असणारा पाहिजे. कारण या कामासाठी वेळ, आवड आणि सवडीनुसार काम हे गणित या आधी जुळले नाही अन यापुढेही जुळणार नाही. मग असे कार्यकर्ते मिळवायचे कसे? तात्कालिक प्रश्नावर काम करणारा माणूस जोपर्यंत 'ग्राऊंड झिरो' ला सामोरा जात नाही तोपर्यंत चौकटीतून बाहेर येऊन उत्तरही शोधू शकत नाही...

आणि या सगळ्यांसोबतच महत्त्वाचा प्रश्न उरतो तो म्हणजे-काम अधिक आव्हानात्मक आणि कमी sustainable ठेऊन प्रत्यक्ष प्रश्नाला भिडायचे की उलट अधिक sustainable, सुरक्षित आणि दीर्घकालीन कामासाठी रचनात्मक पद्धती स्वीकारायची?

Sunday, March 10, 2013

पत्र चौथे:वर्तमानाच्या नजरेतून इतिहास....


वर्तमानाच्या नजरेतून इतिहास.... 

काश्मीरचा तरुण आणि त्याची मानसिकता यांचा विचार करताना काही गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. त्यांची सध्याची मानसिकता तयार होण्यामागे ज्या 'इतिहासाची' भूमिका आहे, तो इतिहास आपल्या दृष्टीने वेगळा आणि त्यांच्या दृष्टीने वेगळा आहे.आपल्यासाठी भलेही हा इतिहास १७ व्या, १८ व्या, १९ व्या शतकाचे दाखले देत असेल, पण सामान्य काश्मीरी तरुणासाठीचा इतिहास गेल्या २० वर्षांचाच आहे.

बिजबिहाराच्या युवक गटाबरोबरच्या एका बैठकीमध्ये तेथील सततच्या अस्थिर परिस्थितीबद्दलचा विषय निघाला. हे सगळे नक्की कशामुळे होते? खरे कारण काय?असे विचारले असता त्यांनी एक घटना सांगितली. १९८५ साली (मकबूल बटच्या फाशीनंतर) बिजबिहारामध्ये एक जुलूस निघाला होता. त्यावर सुरक्षादलाकडून गोळीबार झाला, ज्यामध्ये ४० जण मारले गेले. त्यामुळे आज २०-२५ वर्षे वयाच्या तेथील तरुणासाठी हाच इतिहास आहे, की सैन्यदले आणि पर्यायाने भारत यांची काश्मीर व तेथील लोकांबाबतची भूमिका ही नकारार्थीच आहे. ज्या इतिहासाचे बाळकडू लहानपणापासून मिळते, तेच विचार मानसिकता घडवतात. १७ व्या, १८ व्या, १९ व्या शतकातील घटना,२०व्या शतकातील नव्या राजकीय प्रेरणा आणि चळवळी, शेख अब्दुल्ला, भारत, पाकिस्तान, ऊर्वरीत जग आणि काश्मीरचा वाढत गेलेला गुंता यांचा एकमेकांशी काय सबंध आहे हे सामान्य काश्मीरीला समजणे थोडेसे अवघड आहे; तेही विशेषत: मागील २० वर्षांमधील घडलेल्या घटना या जास्त प्रखर व प्रभावी असताना...

आज २१व्या शतकामधले आपण १७, १८, १९ व्या शतकातील घटनांची तार्किक सांगड घालण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्या काळातील साधने, माध्यमे, पद्धती, परंपरा या सगळ्यांचेच आकलन आणि अन्वयार्थ त्याच काळाच्या संदर्भाने लावला जातो का?हा विचारार्ह प्रश्न आहे. ८५ पासूनच्या पुढच्या घटनांचा प्रभाव असणार्या काश्मीरी तरुणांचे भविष्य घडवताना याच घटनांच्या अनुशंगाने असणार्या स्वाभिमानाला, अस्मितेला आणि भावनेला धक्का न लावता हळूहळू दाखले देत देत त्याही आधीच्या भूतकाळात नेले पाहिजे. व्यक्तीची मानसिकता तयार होण्यात इतिहास नक्कीच महत्वाचा आहे. पण म्हणून दोन शतकांपूर्वी(शतकांपूर्वी का दशकांपूर्वी?)इतिहासामध्ये *** असा अन्याय झाला म्हणून आत्ता आपण आंदोलन करत आहोत हे म्हणणे योग्य आहे का? भूतकाळात घडलेल्या चुकांपासून धडा घेऊन भविष्य सुधारण्यासाठी वर्तमानात त्या चुका पुन्हा घडू नयेत म्हणून इतिहास शिकावा, आणि नेमकी याच द्रष्टेपणाची कमी आपल्यामध्ये आढळते.

उदाहरणच द्यायचे झाले तर ते इकॉनॉमिक ब्लॉकेड चे देता येईल. दोन वर्षांपूर्वी अमरनाथ जमीन हस्तांतरणावरून जम्मू-काश्मीरमध्ये विवाद उद्भवला होता. तेव्हा जम्मूहून काश्मीरला जाणार्या सर्व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा आणि काश्मीरमधून विक्रीसाठी बाहेर नेल्या जाणार्या सर्व वस्तूंची वाहतुक जम्मूमधील लोकांकडून अडवून धरण्यात आली होती. अशाच प्रकारच्या एका घटनेला इतिहास साक्षी असूनही असे पाऊल उचलले होते. १९४७ साली पाकिस्तानने काश्मीरची अगदी अशीच अडवणूक केली होती. त्याचा परिणाम म्हणून राजा हरिसिंगचे मत पकिस्तानसाठी प्रतिकूल तर भारतासाठी अनुकूल बनले होते; आणि भारताच्या बाजूला जोडणारा रस्ता बांधण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले होते. या घटनेतून काहीही न शिकता २००८ च्या ब्लॉकेडमध्ये आपली गरज दाखवून देण्याचा प्रयत्न केला आणि परिणामत: काश्मीरमधील नागरीक आणि व्यापार्यांनी 'मुजफ्फराबाद चलो' च्या घोषणा देत पाकव्याप्त काश्मीरकडे मोर्चा वळवला. (खरे पाहता पाकिस्तानात जाण्याच्या अनुषंगाने बनवण्यात आलेल्या घोषणा आंतरराष्ट्रीय दबावामुळे आझाद काश्मीरपुरत्या सीमित झाल्या होत्या.)

ज्या घटिताच्या आधारावर आपण तर्क लढवतो आहोत, त्यापासून काश्मीरी तरुण कोसो दूर आहे. आणि म्हणूनच या पायावर मांडलेले आपले पुढे जाण्याचे, सुधारणेचे विचार त्याच्यासाठी 'परके' ठरतात. म्हणूनच त्याच्या विश्वातील इतिहासाशी आपली ओळख असणे गरजेचे. कारण योग्य ऐतिहासिक संदर्भ समजण्यासाठी आणि तो तेथील तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी या ओळखीचा निश्चितच उपयोग होतो. तेव्हा आत्ताच्या परिस्थितीत काम करताना नक्की काय महत्त्वाचे?- १७, १८, १९ व्या शतकात घडलेल्या घटनांचा प्रतिक्रीयात्मक संदर्भ की मागील २० वर्षांच्या इतिहासाच्या संदर्भाने 'सुधारणां' साठी कृती करताना मागच्या चुका पुन्हा घडू नयेत यासाठी केलेला अभ्यास आणि प्रयत्न...?

पत्र तिसरे : संवाद, नाती आणि एकात्म भाव



 संवाद,  नाती आणि एकात्म भाव 


आजच मी माझ्या भाषणामध्ये मांडल्या जाणार्या काही मुद्द्यांचा विचार करत होतो. तेव्हा आझम इन्कीलाबी बरोबर झालेल्या भेटीचा संदर्भ आठवला. आझम इन्कीलाबी हा काश्मीर खोर्यातील पहिला दहशतवादी म्हणून ओळखला जातो. त्याच्याशी झालेल्या भेटीदरम्यान 'दहशतवादी कसा घडतो?' याबाबतीत चर्चा झाली होती. त्याने दहशतवादी घडण्याच्या काही पायर्या सांगितल्या होत्या. त्याच्या मते-अधिकारांपासून आणि न्याय्य संधींपासून वंचित राहिलेल्या गटाची पहिली पिढी नेहमीच आपल्या न्याय्य आणि समान संधींच्या मागणीसाठी शांततेने मोर्चे काढते, विनम्रतेने अन्याय नष्ट करण्यासाठी अर्ज-विनंत्यांचा मार्ग अवलंबते. पण या मोर्चांना आवर घालण्यासाठी , विरोधाचा आवाज दडपून टाकण्यासाठी सरकार बळाचा वापर करते. पहिल्या पिढीचा दडपला गेलेला आवाज पाहून दुसरी पिढी 'केवळ शांततेने काही मिळणार नाही' या अनुभवाने हिंसेचा मार्ग स्वीकारते. परंतु दुसर्या पिढीच्या हिंसेमध्ये अनेकदा त्यांच्या स्थानीय बांधवांचाच बळी जातो. त्यामुळे लढा देणारी तिसरी पिढी असा विचार करते, की 'निर्णय घेणारे दिल्लीत आहेत. त्यामुळे जोपर्यंत त्यांच्या कानापाशी आवाज होणार नाही तोपर्यंत त्यांना जाग येणार नाही.'त्यामुळेच ही तिसरी पिढी हिंसेचा मार्ग पत्करून आपल्या घरापासून लांब असलेल्या सरकारला जागे करण्यासाठी दिल्ली, मुंबई, बेंगलोर सारख्या ठिकाणी बाँबस्फोट घडवून आणते. आपल्या मागण्या शांततेने मांडणारी पहिली पिढी, दबावशाहीला तेवढेच सक्षम उत्तर देण्यासाठी हातात बंदूक घेतलेली दुसरी पिढी आणि आपला आवाज दूरपर्यंत पोहोचवण्यासाठी अधिकाधिक हिंसक बनलेली तिसरी पिढी असे दहशतवादाचे चक्र!

या तिसर्या टप्प्यापर्यंत पोहोचता पोहोचता गोष्टी एवढ्या गुंतागुंतीच्या होतात की त्याचे स्वरूप भयावह आणि उकल न करता येण्याजोगे वाटू लागते. परंतु याच सगळ्या चक्राला आपण थोडे सोपे केले तर दहशतवादाच्या सुरुवातीचे साधे-सरळ चित्र दिसते, ते असे-समाजामध्ये नेहमीच खालचा आणि वरचा वर्ग असतो. सत्ता, संपत्ती, परंपरेच्या जोरावर एक वर्ग दुसर्या वर्गावर हुकुमत गाजवत असतो. त्यामुळेच विकासाचा असमतोल तयार होतो . आणि दोन्ही वर्गांमधील दरी वाढत जाते. म्हणजेचा खालचा वर्ग आपली स्थिती सुधारण्यासाठी आणि सर्वच बाबतीत betterment साठी वरच्या वर्गाचा विरोध करू लागतो. हा विरोध नोंदवण्यासाठीचे मार्ग वेगवेगळे असतात. याच विरोधाचे पुढचे गुंतागुंतीचे स्वरूप म्हणून 'दहशतवाद' तयार होतो. कोणीही दहशतवादी जन्मत:च तसा नसतो. त्याच्या आजुबाजूची परिस्थिती त्याला तसे बनवते आणि त्यातून हिंसेचे न संपणारे चक्र सुरू होते.

काश्मीरमध्ये आत्ता चालू असणारे काम हे केवळ 'विकासासाठी केलेले तांत्रिक बदल' नाहीत. तर तो एक विचार आहे;आणि काश्मीर ही एक चळवळ आहे जिथे 'सामान्य माणूस' महत्त्वाचा आहे. म्हणूनच दोन्ही भागांमधील खासकरून ऊर्वरीत भारतामधील लोकांमध्ये असणारी उदासीनता कमी करून त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी हे पत्र लिहिले आहे.

मागच्या पत्राच्या अखेरीस मी अपेक्षा आणि संवाद यांच्या बाबतीत लिहीले आहे. मला नक्की काय म्हणायचे आहे याचा खुलासा करण्यासाठी एक उदाहरण देतो-समजा तुम्ही रस्त्यावरून चालला आहात, एक अनोळखी माणूस तुम्हाला मध्येच हटकतो आणि सांगतो की, ''अरे दापोड्यामध्ये जरा कामाची गरज आहे. आपल्याला तिथे जाऊन काम करायचं आहे.' त्याच्या या सांगण्यानंतरची आपली प्रतिक्रीया 'तू कोण सांगणारा?' अशीच असेल. खरे पाहता त्याचा हेतू चांगलाच असेल. पण त्याची अप्रोच होण्याची पद्धत त्याच्या हेतूला पोहोचवण्यासाठी निरुपयोगी असेल. उलट जेव्हा असे काही सांगणारा माणूस या ना त्या मार्गाने तुमच्या ओळखीचा असेल तेव्हा आपण त्याने सांगितलेली गोष्ट करू वा ना करू ; पण किमान त्या गोष्टीचा 'विचार' करू.गेली ६० वर्षे काश्मीरमध्ये अगदी असेच होत आहे. काश्मीरी माणूस कसा आहे, त्याचे प्रश्न काय आहेत, विचार काय आहेत (मानसिकता), काश्मीरी माणसाने कसे वागावे या बाबतीतल्या कोणत्याही परिस्थितीची कल्पना नसताना, स्वत:च गोष्टी कन्सिडर करून बनवलेल्या आडाख्यांवर आपण घरबसल्या शिक्कामोर्तब केले आहे. खरी परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्नच केला नाही. ६० वर्षांच्या या संवादाच्या अभावामुळे आणि याचा फायदा घेऊन पसरवल्या गेलेल्या गैरसमजांमुळे दोन्ही मनांमध्ये खूप मोठी दरी तयार झाली आहे. ६० वर्षांची ही मोठी दरी कमी करण्यासाठी 'विकास' आणि 'संवाद' वापरून नाती जोडणे हा मार्ग योग्य आहे का? आपणास काय वाटते?

पत्र दुसरे: मानसिकता


मानसिकता 

काही महिन्यांपूर्वी काश्मीरमध्ये शोपियानमध्ये दोन मुलींवर जो अन्याय झाला त्याचा विरोध करण्यासाठी, निषेध आणि चीड नोंदवण्यासाठी संपूर्ण समाज पेटून उठला आणि जवळजवळ दोन महिने काश्मीर बंद होते. समाजात घडणार्या एखाद्या घटनेला प्रतिक्रिया देणार्या 'जिवंत समाजा'त आपण काम करतो आहोत याचा थोडासा दिलासा होता. पण म्हणून प्रतिक्रीया देण्यासाठी वापरलेला दगडफेकीचा मार्ग नक्कीच चुकीचा होता.


बजबिहाराचा युवक गट -काश्मीरचा युवक विभाग रात्री एकत्र जमलेला असताना शोपियानचा विषय  निघाला. त्यातील दोघांनी दगदफेकीत सहभाग घेतला होता; ''दादा, आप हमेशा कहते हो की अच्छा काम करना चाहीए, हमने इस बार करके दिखाया''असे त्या दोघांचे म्हणणे. तर त्यांच्यापैकी एकाच्या मते हा सर्व प्रकार म्हणजे राजकीय डाव आहे. त्यांच्याशी नंतर बोलताना मी त्यांना असे सांगितले की ''असीम जेवढा सक्रीय सहभाग घेते तेवढाच विचाराने सहभाग घेते.दगडफेक साधारणत: दोन प्रकारे होते )निश्चित कारणासाठी) आणि ) लोकांना फक्त प्रभावित करण्यासाठी गरज नसताना वापरलेले साधन म्हणून. शोपियान नंतरची दगडफेक दुसर्या प्रकारची होती. दगडफेकीने साध्य काय झाले? त्या दोघींना न्याय  मिळाला का? उलट आज दोन महिन्यांनंतर समाजाला या गोष्टीचा विसरही पडला...काश्मीर पोलिस आर टी आय अंतर्गत येतात, तेव्हा झाल्या प्रकारानंतर RTI चा वापर करून प्रशासनाची माहितीची मागणी करणं आणि लोकांपर्यंत अशी माहिती पोहोचवण्याचं काम शेवटपर्यंत झालं पाहिजे...'' या चर्चेनंतर गटातील एकाने शोपियानच्या DC आणि DIG ना एक पत्र पाठवले, त्यांच्याकडून काहीच महिती मिळाली नाही. तरी याचा पाठपुरावा करणे चालू आहे.

परंतु काश्मीरमधील एकंदर मानसिकताच वेगळी आहे. बंड शांतीपूर्ण मार्गाने अथवा आक्रमक पद्धतीने करण्यामध्ये एक पुसटशी रेषा आहे. कारण- मानसिकता. उदाहरणच द्यायचे तर स्वाईन फ्लू जेव्हा सुरुवातीला पसरत होता तेव्हा घाबरून जाऊन सर्वांनी मास्कस चढवले होते. पण जेव्हा रोजचेच झाले तेव्हा सोडून दिले. अगदी तसेच त्यांना आता आर्मी ची भीती वाटत नाही. असेही मारणार आणि तसेही मारणारच...

एक घटना आठवते. २००४ ला काश्मीरला भूकंपाचा मोठा धक्का बसला. भूकंप होत असताना आम्ही सगळेच घाबरून आपापल्या गाड्यांमधून उतरून हायवे वर आडवे झालो. तेव्हा हायवे रिकामा ठेवण्याची जबाबदारी असलेला एक जवान तेथे आला आणि आम्हाला रस्ता रिकामा करा, उठा, असे ओरडू लागला. तेव्हा त्याने रोखलेल्या बंदुकीसमोर सगळा काश्मीरी जमाव निडरपणे उभा राहिला. कारण परिस्थितीचा विचार न करता तो आपल्या शक्तीचा गैरवापर करत होता, त्यामुळेच माझ्याबरोबर असलेले सर्व काश्मीरी त्याच्यावर संतापले होते. तेव्हा मी मध्यस्थी करून वरिष्ठांना सर्वांची माफी मागायला लावल्यावर सर्वजण शांत झाले. थोडक्यात काय, तर कोणाच्याही सहन करण्याच्या आणि शांत राहण्याच्या क्षमतेवर मर्यादा असतात हे लक्षात घेतले पाहिजे.

गेली २० वर्षे काश्मीरी माणूस अशांतता, हिंसा, मृत्यू, बेभरवशाच्या छायेत वावरतो आहे. गेली २० वर्षे सकाळी बाहेर पडल्यानंतर संध्याकाळी घरी परतण्याची खात्री आणि शाश्वती त्याला देता येत नाही. गेल्या २० वर्षात सामान्य काश्मीरी मुलाच्या शिक्षणात सातत्य राहू शकलेले नाही. गेल्या अनेक पिढ्या प्रत्येक काश्मीरीला 'अतिरेकी' असण्याच्या संशयानेचबाहेर सर्वत्र पाहिले जाते...तर मग अशा समाजाकडून 'योग्य निर्णय' घेण्याची अपेक्षा कितपत ठेवावी? त्यांच्याशी कोणत्याही प्रकारे संवाद न साधता, त्यांना जाणून न घेता त्यांच्याकडून शांततापूर्ण मार्गांची अपेक्षा करणं ही चूक होत नाही का?

पत्र पहिले: बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर


बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर

काश्मीरमध्ये काम करताना अनेक अनुभव गाठीशी बांधले गेले. पण प्रत्येक काश्मीरी माणसाच्या मनात नेहमीच सलणारा प्रश्न बॉम्बस्फोटांच्या (१३/२, पुणे) निमित्ताने अगदी प्रकर्षाने जाणवला. लिहावं की नाही आणि लिहावं तर कसं हे समजत नव्हतं...शेवटी आज नेहमीप्रमाणे न विचार करता लिहायला बसलो आहे...

परवा सकाळमध्ये बातमी वाचली-'२२०० घरांवर छापे, भाडेकरूंची माहिती द्यावी, पोलीसांची शोधमोहिम'-मनात एकदम विचारांची गर्दी झाली; कारण याच वर्षी नूर महम्मद बसू या माझ्या मित्राला मी पुण्यामध्ये आणले आहे. काश्मीरमधील बंद, संप अशा पार्श्वभूमीवर शिक्षणामध्ये  येणार्या अडथळ्यांशिवाय त्याने शिकावे आणि याचीच पुनरावृत्ती काश्मीरमध्ये करावी असे वाटते. म्हणूनच सहकार्यांच्या सहाय्याने त्याला अॅडमिशन मिळवून देण्यासाठी प्रयत्न चालू केले. त्यासाठीची कागदपत्रे मागवून त्याला इथेच थांबवून घेतले आणि ''आता सहा महिने कार्यकर्ता कसा असतो हे बघ...थोडे मराठी शिक...एकात्मतेची भावना जप आणि मग एकत्र काम करता करता शिक्षण घे'' असे त्याला सांगितले आणि इथे ठेवून घेतले.

खूप एक्सट्रीम चा विचार केला तर समजा नूर ला चौकशीसाठी पोलिसांनी पकडले तर नूरला सोडवायला आणि त्याच बरोबरीने आपल्याला आपले काम सिद्ध करून जबाबदारी स्वीकारायला २-३ दिवस लागले तर त्या वेळात नूरच्या विचारांमध्ये होणार्या बदलांचे अंदाज बघता , २००७ मध्ये कश्मीरमध्ये कश्मीर युनिवर्सिटी मध्ये झालेल्या चर्चेची आठवण झाली...

चर्चेदरम्यान एक मुलगा तावातावाने म्हणाला,''मैं कहीं पे भी जाऊं, मुझे हमेशा मिलिटंट कह के ही बुलाया जाता है. हर कश्मीरी मिलिटंट नही होता. लोग मजाक में भी कहते है. लेकिन हमे सीनेमें चोट लगती है. उपरसे ये आर्मी वाले जिंदा नही रहने देते... मेरे घर में अंदर- बाहर करने के लिये मुझे आय कार्ड दिखाना पडता है. इनके पास ताक़द है, तो उनकी मनमानी चलती है. ना इधर जी सकते है, ता उधर. एक तरफ फौज और दूसरी तरफ मिलिटंट्स...''

आर्मी च्या प्रश्नावर उत्तर शोधताना मी त्याला म्हणाले होतो, की सिस्टिम चुकीची आहे, चूक करतही आहे असे मानू. पण म्हणून ती संपवणे हा उपाय नाही होऊ शकत, आपणही सिस्टीमचे भाग आहोत आणि सिस्टीम आपल्यालाच बदलावी लागेल ; पण दगड-बंदुकीने नव्हे...आणि मग एक रोप क्लाईंबिंग चे उदाहरण देऊन मी त्याला हे समजावले होते-गाठ टोचतीये म्हणून सोडली तर खाली पडून कपाळमोक्षच! गाठीची आवश्यकता आहेच. मग मऊ गाठ बांधणे किंवा ती टोचू नये म्हणून अॅडिशनल सपोर्ट किंवा कुशनिंग करणे गरजेचे आहे.

अनुत्तरित राहिला पहिला प्रश्न...जो आज पुण्यात झालेल्या ब्लास्टने पुन्हा समोर उभा राहिला-''जहाँ भी जाओ हमें मिलिटंट्स ही समझते है'' या २२०० लोकांच्या धरपकडीची बातमी वाचताच नूरच्या घरातील, त्याचा मित्रपरिवारातील सगळ्यांचे फोन येऊन गेले-''सारंग भैय्या, आपकी जिम्मेदारी पर उसको वहाँ भेजा है; मासूम है, छोटा है, कुछ परेशानी तो नहीं होगी? आपभी इनके सामने क्या कर पाओगे? हालात बहुत नाजूक हो चुके है और हम कश्मीरियों पे तो जैसे मिलिटंट होनेकी मोहर ही लगा दी है...हम हमारे बच्चेको पढाना चाहते है...''

याच बोलण्यात त्यांनी असेही सांगितले, ब्लास्ट नंतर जखमी लोकांना सहानुभूती, रक्त, उपचार यांची गरज आहे की यांच्यापैकी कोणी अतिरेकी आहे का याची चाचपणी आधी व्हावी?काश्मीरमध्ये अनेकवेळा ब्लास्ट झाले, होतात, पण म्हणून प्रत्येक काश्मीरी अतिरेकी नाही. गरज मानवतेच्या दृष्टिकोनाची आणि सहानुभूतीची आहे...

हे कोडं सोडवण्यासाठी आपल्या सर्वांच्या सजेशन्सची गरज आहे
Dear All....


Since last 4 years I have been writing letters about things happening around us in Jammu and Kashmir as well as in rest of India.... These are 38 letters so far. I thought of sharing them with you step by step. These are letters from my heart written while working in border regions. I hope you would like to read them :)