प्रकाशाची खरी किंमत
सीमाभागात काम करताना मला अनेकदा एक प्रश्न विचारला जातो – "तुमच्या कामातलं सर्वात समाधान देणारं क्षण कोणता?" खरं सांगायचं तर, या प्रश्नाचं उत्तर एखादा पुरस्कार, एखादा मोठा प्रकल्प किंवा एखादा मानाचा क्षण नाही. माझ्या डोळ्यासमोर आजही एकच दृश्य उभं राहतं – काश्मीरमधल्या एका दुर्गम गावात पहिल्यांदा लागलेले दिवे... आणि त्या प्रकाशात आनंदाने नाचणारी माणसं.
ते गाव अनेक वर्षे अंधारात जगत होतं. तिथे राहणाऱ्या कुटुंबांनी कधी नियमित वीज पाहिलीच नव्हती. आम्ही त्या गावात सोलर मायक्रो ग्रिड उभारण्याचा निर्णय घेतला. अनेकदा लोकांना वाटतं की विकास म्हणजे मोठे आकडे. पण त्या गावासाठी आमच्याकडे मेगावॅट नव्हते. संपूर्ण गावासाठी अवघा ५ KVA क्षमतेचा सोलर ग्रिड आणि प्रत्येक घरासाठी फक्त ५० वॅट वीज होती. शहरातल्या एखाद्या घरात एका एसीला जितकी वीज लागते, त्यापेक्षा कमी.
पण त्या दिवशी मला एक गोष्ट समजली. माणूस केवळ वीज मिळाल्यामुळे आनंदी होत नाही. तो आनंदी होतो, जेव्हा त्याला जाणवतं की *"कोणीतरी आमच्यासाठी थांबलं, विचार केला आणि काहीतरी केलं."* त्या ५० वॅटच्या दिव्याने त्यांच्या आयुष्यातील सगळ्या समस्या सोडवल्या नव्हत्या. पण त्या दिव्याने त्यांच्या मनात एक विश्वास निर्माण केला होता—"आमची सुरुवात झाली आहे."
आम्ही काश्मीरमधील तेरा गावांमध्ये असे सोलर ग्रिड उभारले. पण या प्रकल्पातला माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचा भाग तांत्रिक नव्हता. प्रत्येक सोलर ग्रिड आम्ही त्या परिसरासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या एका शहीद सैनिकाला समर्पित केला. उद्घाटनासाठी आम्ही राजकारणी, अधिकारी किंवा प्रसिद्ध व्यक्तींना बोलावलं नाही. त्या शहीदाच्या आई-वडिलांना, पत्नीला किंवा कुटुंबीयांना आम्ही आमंत्रित केलं. त्यांच्या हस्ते तो प्रकल्प गावाला अर्पण झाला.
हा कार्यक्रम वीज सुरू करण्याचा नव्हता. हा आमच्या कृतज्ञतेचा एक छोटासा प्रयत्न होता. देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या सैनिकाला आपण परत काहीच देऊ शकत नाही. पण त्याने ज्या भूमीसाठी प्राण दिले, त्या भूमीवर राहणाऱ्या लोकांच्या आयुष्यात थोडासा प्रकाश आणता आला, तर ती आमच्या दृष्टीने खरी आदरांजली होती.
त्या दिवसानंतर मला विकासाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. आपण अनेकदा विचार करतो की बदल घडवायचा असेल तर मोठे प्रकल्प, मोठा निधी आणि मोठी साधनं लागतात. पण माझा अनुभव काही वेगळंच सांगतो. अनेकदा माणसाला सर्वात आधी गरज असते ती आशेची. त्याला वाटलं पाहिजे की "मी एकटा नाही. माझ्यासाठी कुणीतरी उभं आहे." त्या भावनेनंतरच विकासाची खरी वाट सुरू होते.
आजही जेव्हा मी त्या गावांची आठवण काढतो, तेव्हा मला ५ KVA आठवत नाही, ५० वॅटही आठवत नाही. माझ्या डोळ्यासमोर उभं राहतं ते प्रकाशात नाचणारं गाव. कारण त्या दिवशी मला एक गोष्ट कायमची समजली,
*प्रकाशाची किंमत त्याच्या क्षमतेत नसते; ती तो माणसांच्या मनात निर्माण करणाऱ्या विश्वासात असते.*
सारंग गोसावी

No comments:
Post a Comment