Thursday, May 29, 2014

कलम ३७०- उमर अब्दुल्ला यांच्या ताज्या विधानांना उत्तर देताना

नमस्कार. 

कलम ३७० बद्दल गेल्याच आठवड्यात अपना सर्वांशी एका पत्राच्या माध्यमातून संवाद साधला परंतु त्या मधेही आणखी काही घडामोडींनी थोडेसे अधिक स्पष्टपणे बोलण्याची गरज निर्माण केली. म्हणून या email च्या माध्यमातून पुन्हा काही मुद्दे आपल्यासमोर मांडत आहे. 

भारताच्या राजकीय पातळीवरच्या मोठ्या स्थित्यंतरानंतर कलम ३७० हा सध्याचा बहुचर्चित विषय बनलेला दिसतो आहे. राजकीय अपेक्षांचा एक भाग म्हणून आणि त्याचबरोबर एका विशिष्ट विचारप्रणालीचा पुरस्कार म्हणून हा मुद्दा चर्चेत येतो आहे. त्यातच भर म्हणून जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी केलेले विधान नव्या वादाला तोंड फोडणारे आहे. 

कलम ३७० च्या विषयी मी माझे मत नुकतेच एका पत्राद्वारे मांडले आहे. परंतु या मुद्द्याचा विचार करताना तयार होणारे विविध दृष्टीकोन जसे वाटतात तसेच स्वीकारून दृढ होण्याआधी काही आणखी मुद्द्यांचा विचार या संदर्भात व्हावा असे वाटते. कलम ३७० चा विचार हा ज्याप्रमाणे ऐतिहासिक, संवैधानिक, राजकीय सामाजिक आणि आर्थिक अंगांनी केला जातो त्याचप्रमाणे तो मानसिक आणि भावनिक पातळीवरही केला जातो. या अनेकपदरी विचारांमुळेच या विषयामधली गुंतागुंत जास्त मोठी वाटते. 

उमर अब्दुला आणि इतर काश्मिरी नेत्यांच्या कालच्या आणि आजच्या विधानांमुळे कलम ३७० हे न काढता येणारे कलम असल्याचा आभास तयार होतो. परंतु या संदर्भात अधिक साकल्याने आणि एकसंधपणे विचार झाला पाहिजे. 

कलम ३७० ची गरज स्थित्यंतराच्या कालावधीसाठी 'तात्पुरती' म्हणून मान्य केली गेली. जम्मू काश्मीरसाठी केंद्र सरकार पेक्षा राज्य सरकारला दिले गेलेले महत्त्व म्हणजे  कलम ३७० ने या राज्याला दिलेला विशेष दर्जा! या  कलमाची गरज आणि तर्कशुद्धता तसेच कालपरत्त्वे त्यातून जाणवणारे काही कळीचे मुद्दे यांचा विचार एकत्रितपणे करावा लागेल. कलम ३७० ची  पाठराखण करणारे या कलमाची गरज सांस्कृतिक अस्मितेचे जतन करण्याकरीता असल्याचे आग्रहाने सांगतात, परंतु सांस्कृतिक अस्मिता भारतीय संघराज्यातील प्रत्येक राज्यालाच आहे. मग जम्मू काश्मीर ला वेगळ्या आणि विशिष्ट दर्जाची गरज का पडावी? कलम ३७० ला न काढता येणारे कलम म्हणणाऱ्र्यांसाठी काही मुद्दे येथे मांडत आहे.

> कलम ३७० काढण्यासंदार्भातील निर्णय हा जम्मू काश्मीर ची संविधान सभा घेऊ शकेल, जी आज अस्तित्त्वात नाही. या कारणाने कलम ३७० रद्द करण्याचा मार्ग आणि पर्याय उपलब्ध नाही, असा युक्तिवाद केला जातो. मात्र जी संस्था आज अस्तित्त्वात नाही अशा संस्थेच्या/घटकाच्या नसण्याने आवश्यक बदल करण्यापासून रोखणे असंवैधानिक ठरेल. कारण भारतीय संविधान हे जेवढे ताठर तेवढेच लवचिक आहे. आणि काळाच्या गरजेनुसार होणारे बदल संविधानाच्या आत्म्याला धक्का पोहोचवणारे नाहीत. 

> भारतीय राज्यघटनेच्या कलम १ मध्ये संघराज्यात समाविष्ट झालेल्या - होणाऱ्या प्रदेशांबद्दल स्पष्टीकरण दिले आहे आणि त्याचबरोबर संघराज्यातील नावे ज्या परिशिष्टात समाविष्ट केली आहेत त्यात जम्मू काश्मीर हे राज्य १५व्या क्रमांकाचे आहे. कलम १ आणि हे परिशिष्ट हे दोन्ही भारतीय राज्यघटनेचे मूलभूत घटक आहेत. दुसरीकडे कलम ३७० हा राज्यघटनेचा अस्थायी स्वरूपाचा घटक आहे. अशावेळी अधिक महत्त्व कशाला मिळाले पाहिजे याचा निर्णय घेणे अवघड नसावे. 

> भारतीय संसद  ही सार्वभौम असल्याने कायदे करणे किंवा कायद्यामध्ये दुरुस्ती करणे हे अधिकार तिच्याकडेच राहतात. उलट ज्या जम्मू काश्मीर च्या संविधान सभेच्या परवानगी चा विचार करायचा ती संस्था वर्तमानात अस्तित्त्वात नाही. अशा वेळी संसद आपले अधिकारक्षेत्र वापरून कलम ३७० ला रद्द करण्यामध्ये अडथळा ठरणारे 'राज्य संविधान सभेची पूर्वानुमती घेल्याशिवाय' असे शब्द काढून टाकून राष्ट्रपतींच्या अधिसूचनेने कलम ३७० रद्द करू शकते. (भारताच्या संसदेतील प्रतिनिधींमध्ये जम्मू काश्मीरचे प्रतिनिधीही समाविष्ट असतात हे विशेष लक्षात घ्यावे.) 

> कलम ३७० ने नागरिकत्त्व आणि मालमत्तेच्या अधिकारासंदर्भात ज्या काही वेगळ्या नियमांची निर्मिती केली आहे त्याचा फायदा भ्रष्टाचार आणि भांडवलशाही ला होत असल्याची अनेक उदाहरणे सापडतात. तेथे नागरी कमाल जमीन धारणा कायदा लागू नसल्याने बड्या बड्या व्यक्तींच्या हातात विकासाची साधने एकवटली जात आहेत. (उदा. नेदुस हॉटेल प्रकरण) महिलांसाठी नागरीकात्त्वाचे अधिकार  तसेच त्यांच्या वारसाहक्काने किंवा नागरिक म्हणून संपत्ती मालकीहक्काने बाळगण्याच्या अधिकारावर कलम ३७० मर्यादा आणत आहे. तसेच श्रीमंत आणि गरीब यांच्यामधली दरी अधिकाधिक मोठी होत आहे

>  कलम ३७० च्या निर्मितीनंतर ते आजपर्यंत चा विचार एकत्रितपणे केला तर बदलेली परिस्थिती असे दाखवते की कलम ३७० चा उपयोग जम्मू काश्मीर आणि उर्वरित भारत यांच्यामध्ये दरी तयार करणे आणि ती वाढवणे यासाठी केला जात आहे. उलट सामान्य काश्मिरीच्या भावनांना हात घालून कलम ३७० ने त्याच्याच विकासाच्या संधी मूठभर श्रीमंतांनी दाबून ठेवल्याचे सत्य लपवून त्याऐवजी प्रादेशिक अस्मिता किंवा स्वायत्ततेच्या आभासांना सातत्याने समोर आणले जात आहे. 

> उपरोल्लेखित स्वायत्ततेची मागणी प्रशासकीय सुधारणा किंवा विकासाची कामे करण्यासाठी नसून या स्वायत्ततेचा गूढार्थ सामान्य काश्मिरी जनतेला राष्ट्राच्या मुख्य प्रवाहापासून दूर ठेवण्याचा असावा असे दिसते. याच सामान्य माणसाला आर्थिक प्रगतीतील वाटा नाकारून कोण कोण आपली पोटे भरून घेत आहेत याचा विचार सामान्य काश्मिरी माणसानेही करावयास हवा. अर्थात जम्मू काश्मीर च्या संविधानाच्या माध्यमातून स्वायत्ततेचा विचार करायचा झाला तर मुळात जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे असे मान्य करूनच मग पुढे जावे लगेल. कारण जम्मू काश्मीर च्या स्वतंत्र राज्यघटनेत आणि शिवाय राज्य विधीमंडळातही तसे म्हटले गेले आहे. परंतु अशी एकाच देशात राहून आणि राष्ट्राशी एकात्मता मानून अधिकाधिक स्वायत्ततेची मागणी सर्वच राज्यांनी करायला सुरुवात केली तर मग एक राष्ट्र म्हणून भारताचे अस्तित्त्व केवळ संघाच्या (Union) कर्तव्यांपुरते नाममात्र उरेल. आणि अधिकार मात्र विकेंद्रित स्वरुपात राज्यांकडे जातील ज्याचा एकत्रित मेळ घालणे शक्य नाही. 

> ज्या ज्या राजकीय नेत्यांनी या दोन दिवसात कलम ३७० ची पाठराखण केली ते सोयीस्करपणे 'जम्मू काश्मीरचे नेते' असतात. कारण त्यांची आताची विधाने ही जम्मू आणि लदाख मधील जनतेच्या भावना दुर्लक्षून केली  गेली आहेत. जम्मू आणि लदाख चा भाग हा कित्येक वर्षे सर्वच क्षेत्रात डावलले गेल्याची तक्रार करतो आहे. लदाख च्या भागाने तर १९४९ पासून (कलम ३७० लागू होण्याआधीच) काश्मीरच्या वर्चस्वाखाली राहण्यापेक्षा केंद्र सरकारच्या अखत्यारीत राहण्याची मागणी केली होती. मात्र ती दुर्लक्षिली गेली. तीच भावना १९८६ मध्ये लदाख मध्ये झालेल्या दंग्यांच्या वेळी पुन्हा दिसून आली. जम्मूच्या भागातून या संदर्भातील भावना २००८ च्या अमरनाथ जमीन हस्तांतरणाच्या वादाच्या वेळी प्रखरपणे समोर आली आहे. त्याचबरोबर जम्मू च्या प्रदेशमध्ये पश्चिम पाकिस्तानातून आलेला एक मोठा लोकसंख्येचा भाग आज इतकी वर्षे राज्याच्या नागरीकात्त्वाच्या मूलभूत अधिकारांपासून वंचित राहिला आहे. राष्ट्राचे नागरिक म्हणून त्यांना मान्यता मिळालेली असली तरी कलम ३७० च्या अडथळ्यामुळे जम्मू काश्मीर चे नागरिक म्हणून त्यांना मान्यता मिळू शकलेली नाही. त्यांना जाणवणारे प्रश्न, त्यांच्या अडचणी या जर नेत्यांच्या खिजगणतीत नसतील तर स्वत:ला संपूर्ण जम्मू काश्मीर चे नेते म्हणवून घेण्याचा त्यांनी पुनर्विचार करावा. 'जम्मू-काश्मीर' चे नेते म्हणून आम्ही जर फक्त काश्मीर खोऱ्याचा (तोही अभासी) आवाज ऐकवणार असू तर नेत्तृत्त्व म्हणून तो सर्वात मोठा अवगुण मानला पाहिजे! आपल्या भावनिक आव्हानांमध्ये आम्ही कोणकोणत्या  प्रकारच्या पातळ्यांवरचे शोषण दडपून टाकतो आहोत याचा विचार केला पाहिजे. कलम ३७० चा वापर स्वार्थासाठी करताना आणि त्यामागचा स्वार्थ झाकून टाकताना सर्वसामान्याच्या भावना खोट्या भावनिक आव्हानांशी जोडणे किती काळ होत राहणार?

जम्मू काश्मीर आणि कलम ३७० बद्दल आजचे उमर अब्दुल्ला यांचे विधान हे काश्मीर च्या परिस्थितीच्या संदर्भात अर्धसत्य गृहीतकांच्या आधारावर केलेले आणि कालपरत्वे होणारे बदल नाकारणारे विधान म्हणावे लागेल. कलम ३७० चे असणे हे राष्ट्राच्या एकात्मतेच्या प्रक्रियेतील अडसर आहे हे नक्की परंतु त्या कलमाला अडसर म्हणताना तो एकमेव अडसर आणि सर्व प्रश्नांचे एकच एक मूळ बनू शकत नाही हेही नक्की. कलम ३७० मुळे स्थानिक नागरिकांना त्यांच्या विकासाच्या मार्गात येणारे अडथळे समजले आणि या कलमाच्या आभासी प्रतिमेचा मूठभर प्रभुत्त्वाची (राजकीय किंवा आर्थिक) इच्छा करणाऱ्या व्यक्तींनी उभा केलेला पडदा दूर झाला की आपोआपच उर्वरित भारताप्रमाणे जम्मू काश्मीर मधील नागरिकांकडून कलम ३७० हटवण्याचा आग्रह धरला जाईल.

कलम ३७० ला एक व्यक्ती म्हणून आपला असणारा विरोध किंवा अगदी पाठिंबाही दुसरी बाजू लक्षात घेल्याशिवाय नसावा. यासाठी संदर्भ म्हणून जम्मू काश्मीर चे माजी गव्हर्नर जगमोहन यांच्या पुस्तकातील ६ व भाग- ३७० व्या कलमाची कुळकथा हा भाग आणि अलीकडची त्यांची मुलाखत http://www.theindianrepublic.com/tbp/article-370-misconceived-interview-jagmohan-former-governor-jk-100037563.html नक्की उपयोगी पडेल. तसेच कलम ३७० ची पाठराखण करणाऱ्या अनेकांपैकी ए. जी. नूरानी यांचा लेख http://www.frontline.in/static/html/fl1719/17190890.htm तसेच Greater Kashmir या काश्मीर खोऱ्यातून प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्रातील विविध लेखांचा संदर्भ घेता येईल. 

कलम ३७० मुळे तयार होणाऱ्या भावनेवर उपाययोजना वेळीच अपेक्षित आहे आणि ती लावूनही धरली पाहिजे परंतु अशा वेळी होणारा विरोध हा केवळ विरोधासाठी होणारा विरोध किंवा राग अथवा द्वेषाची भावना मनात ठेवून होणारा विरोध असा उथळ नक्कीच नसला पाहिजे असे मला वाटते.  


आपला, 
सारंग गोसावी 

Wednesday, May 21, 2014

पत्र ४४: कलम ३७०


पत्र ४४

      जम्मू-काश्मीर बद्दलचा विचार करताना कलम ३७० चा विचार आणि चर्चा अपरिहार्यपणे समोर येतेच. उर्वरित भारतीयांशी संवाद साधताना भारतीय संविधानातल्या या कलमामुळे जम्मू-काश्मीर राज्याला मिळालेल्या विशिष्ट दर्जाला होणारा विरोध मोठ्या प्रमाणात जाणवतो. म्हणून आज मुद्दाम कलम ३७० बद्दल स्वतंत्रपणे पत्र लिहित आहे. केवळ कलमांनी, कायद्यांनी आणि बंधनांनी राष्ट्र एकत्र ठेवता येत नाही, त्याला मनांचीही जोड लागते यावर माझा विश्वास आहे. परंतु राष्ट्र म्हणून असणारे अस्तित्व एकजिनसीपणे व्यक्त होण्याची चौकट म्हणून कलम-कायदे आणि बंधनांचा विचार आवश्यक आहे हेही तितकेच खरे. कलम ३७० बद्दलची चर्चा उर्वरित भारतात सध्या विशिष्ट प्रकारच्या मुद्यांना अधोरेखित करून केली जाते. अलीकडच्या राजकीय स्थित्यंतरामुळे या प्रचाराची धार तीव्र बनली आहे. लोकशाही म्हणून अशी विचारसरणी व्यक्त करण्याचा अधिकार आपल्या पत्येकाला आहे. पण आपला हा प्रचार विचारपूर्वक, तर्कसंगत, वस्तुस्थितीला धरून आणि नीरक्षीर विवेकाचा आहे न हे तपासून पाहायला हवे. राष्ट्रवादी मागणीचा भाग म्हणून आपण कलम ३७० रद्द करण्याचा आग्रह धरणे चुकीचे नाही. पण हा आग्रह ज्या पायावर धरला जातो आहे तो पाया पक्का आहे ना याची शहानिशा वेळीच करून घेणे हे या मागणीच्या validity साठी गरजेचे आहे. महत्वाची गोष्ट अशी कि भारतीय संविधानातील कोणतीही बाब राष्ट्र म्हणून आपल्याला एकत्र आणणारी असली पाहिजे, भेट निर्माण करणारी नव्हे ! म्हणूनच कलम ३७० बद्दल सर्वंकष आणि परिपूर्ण विचार करून आपण आपण त्याबद्दलच्या आपल्या मतांना मांडले पाहिजे. त्रुटी असणारी माहिती स्वीकारणे आणि त्याचा उपयोग करून भावना भडकावणे हे दीर्घकालीन देशहितासाठी हानिकारक नव्हे का ?

      खरेतर कलम ३७० बद्दल विविध प्रकारे आक्षेप घेतले जातात. यापैकीच सध्या एक १५ ते १७ मुद्यांचे म्हणणे social networking च्या माध्यमातून फिरते आहे. सध्याच्या लिखाणाला आपण त्याचाच आधार घेऊ. त्यामध्ये उल्लेखलेले काही मुद्दे योग्य आणि बरोबरही आहेत. परंतु त्या म्हणण्याचा एकत्र विचार करता त्याचा अर्थ हा अर्धसत्य आणि तपासून न घेतलेल्या गृहीताकांचा लागतो. त्यांची माहिती आपण सर्वांनी करून घ्यायला हवी.

      पं. नेहरू यांची जम्मू-काश्मीर बद्दलची भूमिका स्वप्नाळू आणि आदर्शवादी होती. १९४७ सालच्या पाकिस्तानच्या जम्मू-काश्मीर वरील चढाईनंतर तो प्रश्न संयुक्त राष्ट्रात नेल्यामुळे त्याला आंतरराष्ट्रीय संदर्भ आले होते. अशा पार्श्वभूमीवर १९४९ साली जम्मू-काश्मीर ला तात्पुरत्या स्वरूपाचे कलम ३७० लावले गेले. १९४७ सालच्या युद्धानंतर जम्मू-काश्मीर राज्याचा काही भाग पाकिस्तानच्या ताब्यात राहिला. तेव्हा या संपूर्ण भागाला उर्वरित भारताशी जोडून घेण्याच्या न्याय्य प्रक्रियेचा भाग म्हणून या भागातील demographic बदल टाळण्यासाठी कलम ३७० चा विचार केला गेला. आज २०१४ सालापर्यंत कलम ३७० च्या स्वरुपात कोणतेही बदल आले नाहीत असे म्हणणे धाडसाचे ठरेल.

      कलम ३७० बद्दलचा पहिला आक्षेप हा दुहेरी नागरिकत्वाच्या मुद्यावरून येतो. भारतीय संघराज्याने भारतीय नागरीकत्वाबाबत केलेल्या नियमांनुसार कोणत्याही व्यक्तीस संघ आणि राज्य अशी स्वतंत्र नागरीकत्वे मिळत नाहीत. परंतु कलम ३७० मुले मात्र जम्मू-काश्मीरचे स्वतंत्र नागरिकत्व प्राप्त होते. परंतु हे स्वतंत्र नागरिकत्व कधी मिळते ? तर जम्मू-काश्मीरच्या राज्यघटनेत असे स्पष्टपणे नमूद केले आहे की ' जी व्यक्ती भारताची नागरिक असेल त्याच व्यक्तीस जम्मू-काश्मीरचे कायमस्वरूपी नागरिकत्व मिळेल '. शिवाय पाकिस्तानी नागरिकांना जम्मू-काश्मीरचे नागरिकत्व मिळण्याबाबत कोणताही उल्लेख कलम ३७० अथवा जम्मू-काश्मीरच्या घटनेत नाही. पाकिस्तानने १९४७ च्या युद्धादरम्यान व्यापलेल्या आणि १ मार्च १९४७ पूर्वी पाकिस्तानात गेलेल्या व्यक्तीस कायमस्वरूपी नागरिकत्व (परत आल्यानंतर) देता येते. या दुहेरी नागरिकत्वाचा खूप मोठं पश्चिम पाकिस्तानी निर्वासितांना बसला आहे.

      कलम ३७० बद्दलचा दुसरा आक्षेप असं कि राज्यामध्ये उर्वरित भारतीयांना जमीन (किंवा स्थावर मालमत्ता) विकत घेता येत नाही. राज्यामध्ये अशा खरेदीसाठी राज्याचे कायमस्वरूपी नागरिकत्व असणे गरजेचे असते, हे खरे आहे. परंतु कलम ३७० मध्ये टप्याटप्याने जे dilution आणले गेले त्याचाच एक भाग म्हणून आज कोणत्याही व्यक्तीला lease वर जमीन घेता येते. शिवाय औद्योगिक वा व्यापारी कंपन्या, not-for-profit, non-governmental संघटना (नोंदणीकृत) व शैक्षणिक उपयोगासाठी जमीन विकतही घेता येते.  त्यामुळे जमिनीच्या खरेदीवर बंधने आल्यामुळे जम्मू-काश्मीरचा औद्योगिक विकास होणार नाही असे म्हणणाऱ्यांनी पुन्हा एकदा कलम ३७० च्या बदललेल्या स्वरूपाकडे लक्ष दिले पाहिजे. महत्वाची गोष्ट अशी की जम्मू-काश्मीर राज्यात विकासाच्या संधींमध्ये अडथळा म्हणून कलम ३७० येत असेलही पण मुळात विकासाचे कोणते model या भागावर लावतो आहोत याचा प्राथमिकतेने विचार झाला पाहिजे.

      कलम ३७० मुळे RTI सारखे कायदे जम्मू-काश्मीर मध्ये लागू नाहीत हे म्हणणे सपशेल खोटे आहे. कारण RTI लागू करणारे जम्मू-काश्मीर हे एक आघाडीचे राज्य होते. इ.स. २००४ मध्येच जम्मू-काश्मीर मध्ये RTI लागू झाला. १९८२ ला पंचायत निवडणुका झाल्या. त्यानंतर परिस्थिती बिघडल्यामुळे त्यात खंड पडला. परंतु आता मात्र स्थिती कमी तणावाची झाल्यानंतर ही प्रक्रिया पुन्हा सुरु करण्यात आलेली आहे.

      RTI प्रमाणेच आणखी एक असत्य बाब म्हणजे तेथील महिलंवर शरिया लागू असण्याचे गृहीतक. जम्मू-काश्मीर मधील महिलांवर शरिया लागू करून त्यांच्यावर बंधने घातली जाण्याकडे आणि शरीयाचा उपयोग म्हणजे पर्यायाने भारतीय न्यायसंस्थेला बगल देण्याचे प्रतिक समजण्याकडे या आक्षेपाचा कल आहे. परंतु शरिया हा मुस्लीम कायदा आहे. शारीयाप्रमाणे निघणारे फतवे हे जम्मू-काश्मीर पेक्षा उर्वरित भारतातूनच अधिक दिसतात. शिवाय जम्मू-काश्मीरमध्ये शीख, हिंदू, बौद्ध महिलाही आहेत. त्यांच्यावर शरिया कसा लावावा ? अर्धविधवांचा प्रश्न काश्मीर खोऱ्यामध्ये तीव्र आहे. नवरा जिवंत आहे तर कुठे आहे आणि मेला असेही ठामपणे म्हणता येत नाही अशा कात्रीत सापडलेल्या या महिलांसाठी पुनर्विवाहाची परवानगी कायद्यानुसार ७ वर्षांनी मिळत होती ती आता न्यायसंस्थेने ३ वर्षांवर आणली. एवढ्या संवेदनशील विषयातही जर भारतीय न्यायसंस्था निर्णय देत असेल तर इतर बाबतीतील अंदाज यावरूनच घेता येईल.

      कलम ३७० ने जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय संसदेचे अधिकारक्षेत्र कमी करून राज्य विधीमंडळाचे क्षेत्र वाढवले आहे. त्यामुळे कोणताही कायदा जम्मू-काश्मीर च्या विधिमंडळात मान्य झाल्याशिवाय तेथे लागू करता येत नाही. परंतु संसदेचे अधिकारक्षेत्र मर्यादित ठेवताना राष्ट्रपतींचे कार्य आणि अधिकारक्षेत्र वाढवले आहे. वेळोवेळी कलम ३७० मध्ये केलेय बदलांनुसार राष्ट्रपतींना अधिकाधिक अधिकार दिले आहेत.

      राष्ट्रध्वजाचा आणि राष्ट्रीय प्रतीकांचा अवमान हा इतर कोणत्याही भागाप्रमाणेच जम्मू-काश्मीर मध्येही गुन्हा आहे. कलम ३७० त्यातून कोणतीही पळवाट देत नाही. मी माझ्या गेल्या १० वर्षांच्या फिरतीमध्ये तिरंग्याचा अपमान झालेला पहिला नाही. (आपणा सर्वांना कधी ना कधी एक e-mail मिळाला असेल ज्यात तिरंगा जळताना दाखवला होता. परंतु हा फोटो १९९३ सालचा आहे.) राष्ट्रध्वजाबरोबरीने गोष्ट येते ती राज्याच्या स्वतंत्र ध्वजाची. जम्मू-काश्मीर ला स्वतंत्र ध्वज आहे पण त्याचे महत्व राष्ट्रध्वजापेक्षा वरचढ नाही. श्यामाप्रसाद मुखर्जींच्या आंदोलनानंतर जम्मू-काश्मीरचा राज्याध्वज राष्ट्रध्वजाखालोखाल वापरला जातो.

      कलम ३७० बद्दल टीका होत असताना आम्ही आम्हाला दिसणाऱ्या सर्वच प्रश्नांना एकाच मुळाशी आणून तर नाही सोडत आहोत ना हे पाहणे महत्वाचे. प्रश्न बहुआयामी असतात. त्यामुळे त्यांचा विचार एका गृहीत प्रवाहाच्या माध्यमातून करणे धोकादायक ठरू शकते. शिवाय कलम ३७० मधील त्रुटी आणि कलम ३७० रद्द करण्याची मागणी हि संवैधानिक नक्की असू शकेल. पण ती कोणाच्याही विभाजित अस्मितेशी जोडली गेलेली नसावी. कलम ३७० मुळे त्या राज्यातील नागरिकांचे होणारे नुकसान त्यांच्या लक्षात आणून देऊन स्वप्रेरीत बदलाचा विचार अधिक समतोल ठरेल. तरच तो राष्ट्र म्हणून एकात्म आणि एकजिनसी विचार होईल. अन्यथा विरोधासाठी विरोधाच्या ओढाताणीत आपापसातील दऱ्या वाढत जातील.

      या पत्रात कलम ३७० बद्दलचा माझा वास्तविक विचार मांडला आहे. तरीही हा विषय लक्षात घेण्याच्या आणखीही काही पद्धती असू शकतात. त्या या पत्राला उत्तर म्हणून जरूर कळवाव्यात. चर्चा करून, समजून घेऊन या विषयाबद्दलची कृती अधिकाधिक विशिष्ट बनेल अशी खात्री वाटते.

 

 

आपला,
सारंग गोसावी

Saturday, April 19, 2014

पत्र सातवे: नेतृत्त्वाचे अवलोकन


नेतृत्त्वाचे अवलोकन 

 दि. १०.०५.२०१०


     काही दिवसांपूर्वी ऑफिसमध्ये सईद अली सहा गिलानींचा एक नातेवाईक भेटण्यासाठी आला होता. एप्रिलच्या दौऱ्यादरम्यान IT Seminar मध्ये काश्मीरमध्ये आणखी एक  IT Company सुरू करण्यासंदर्भात बोलणे झाले होते. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी तो चर्चेसाठी आला होता. तो स्वतः सध्या श्रीनगर मध्ये असतो; त्याचा एक भाऊ बेंगलोर आणि दुसरा दिल्लीमध्ये याच क्षेत्रात कार्यरत आहे. असेच काहीसे बोलणे चालू असताना कौसरचा SMS आला - 
                   "Huriyat calls for Kashmir Bandh against
                    death sentence of two Kashmiris by Delhi
                    court...JKLF supports the call..."
आणि लगेचच लाल चौकाच्या आसपास दगडफेकीच्या आणि लष्कराकडून होणाऱ्या लाठीचार्जच्या बातम्याही पाठोपाठ येऊ लागल्या. एप्रिलच्या दौऱ्याच्या  दरम्यान जवळपास प्रत्येकाने लाल चौक शांत,सुरक्षित आणि सामान्य असल्याचा अनुभव घेतला होता. पण तो आता भास ठरावा असे अशांततेचे, अव्यवस्थेचे सावट लाल चौकात होते - जे TV वरून प्रत्येकाच्या घराघरापर्यंत; पेक्षाही मनामनापर्यंत पोहोचत होते… 



     आमच्या दोघांच्या चर्चेमध्ये हा विषय निघताच तो थोडासा अस्वस्थ झाला आणि मला म्हणाला की 'याच गिलानींचा एक मुलगा UK ला तर दुसरा Canada मध्ये आहे. अशा अस्थिर परिस्थितीत ते आणि त्यांचे कुटुंब कायमच सुरक्षित आहे. खरा करपतो तो सामान्य माणूस. आपल्या आप्तेष्टांना या चढउतारांपासून दूर ठेवून हे नेते. आपण ज्यांच्यामुळे नेते बनलो अशांच्या पोराबाळांना धोक्यात टाकतात, हा कोणता न्याय?'


     पुढे तो असंही म्हणाला की एकीकडे अशी परिस्थिती असताना दुसरीकडे काश्मिरी तरुण दिशाहीन आणि ध्येयहीन आयुष्य जगात आहे. तरुणांच्या मनातील हीच अस्वस्थता त्यांना हिंसक कृतीकडे वळवताना दिसते अहे. या सर्वातून बाहेर पडून काश्मीरचा विकास साधायचा असेल तर त्यासाठी समाजपरिवर्तनाची गरज आहे. याच मुद्द्यावर आमचे बोलणे संपले, तो निघून गेला, पण माझे विचारचक्र सुरु झाले… 


     काश्मीरमध्ये सरकारबद्दल, सरकारी अकार्यक्षमतेबद्दल असंतोष आहे, चीड आहे. शोपियानच्या वेळी संपूर्ण काश्मीर बार आसोसिएशन ने भारतविरोधी पवित्र घेतला. Separatist नेत्यांच्या मनात भारत सरकारविषयी  आणि आता न्यायपालिकेविषयी असणारी अढी नवीन नाही. पण या सरकारविरोधी भावनेमध्ये केवळ system विरुद्धचा राग समाविष्ट नाही तर त्यासोबतच 'आझादी' ची ओढ, आंतरराष्ट्रीय रस, दाबले गेल्याची भावना, आपल्याला फसवले गेल्याचा ग्रह, परिस्थितीविषयीचे सापेक्ष ज्ञान विवादास्पद मुद्दा असल्याने 'मानवाधिकार आयोगा' ची भूमिका आणि सर्वात महत्वाचे म्हणजे परकीय सरकार असल्याचा राग या आणि अशा अनेक गोष्टी परिणामकारक आणि परिस्थितीचा गुंता करण्यात समान हिस्सेदार ठरतात. शिवाय विरोधासाठी अहिंसक पद्धतीऐवजी कायमच हिंसक पद्धत वापरली जात असेल तर या गुंत्यामध्ये भरच पडते. भ्रष्टाचारी, पिळवणूक करणाऱ्या परकीय सत्ताधाऱ्यांविरुद्ध हिंसक आवाज उठवणे अपरिहार्य मानले जाते आणि त्यामुळे अशी परिस्थिती अधिक नाजूक बनते. म्हणूनच एखादी घटनाही संपूर्ण काश्मीरला क्षणार्धात अस्थिर आणि अशांत करू शकते. 


     दिल्लीच्या न्यायालयाने दोघा काश्मिरींना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर उमटलेल्या क्रिया-प्रतिक्रियांमधून उपरोल्लेखित सर्व घटक काश्मीरची परिस्थिती कधी घडवतात हे कोणाही अभ्यासकाला वेगळे सांगणे नको. पण काश्मीरची परिस्थिती कधीच ठोकताळ्यात बसवता येत नाही तशीच याहीवेळी ती दिलेल्या परिमापकांमध्ये मोजून मापून पाहता येणार नाही. 


     अलीकडेच लाल चौकामध्ये एका मोर्चादरम्यान झालेल्या दगडफेकीत बसमधून प्रवास करणाऱ्या एका ४० वर्षीय सरकारी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला - ज्याचा या मोर्चाशी कोणताही संबंध नव्हता. एरवी Army  किंवा इतर फौजांकडून घेतलेल्या 'action' ची खरमरीत बातमी छापणाऱ्या Greater Kashmir ने या बातमीला मात्र फारसे महत्त्व दिले नाही. अर्थात या प्रसंगामुळे 'आम्ही प्रथम हिंसेचा मार्ग स्वीकारत नाही, लष्करी बळाच्या आणि सरकारच्या दबावाला आणि दडपशाहीला विरोध म्हणून आम्ही हिंसेचा मार्ग पत्करतो.' असे  separatists कडून नेहमी केले जाणारे दावे फोल ठरले. पण या बातम्यांना ऊर्वरीत भारतातील आणि काश्मीरमधील माध्यमांकडून कशा प्रकारे मांडले जाते यावर सामान्य माणसाचे मत आणि ग्रह अवलंबून असतात. काश्मीरमधील अस्थिरता, ताणताणाव, हिंसा यांच्याबद्दल हिरीरीने coverage देणारे media वाले ज्या गोष्टीला खरे महत्त्व दिले पाहिजे त्याकडे सोयीस्कर काणाडोळा करतात. लोकांना जे आवडतं  ते आम्ही छापतो / दाखवतो. या कारणापुढे लोकशाहीचा हा महत्त्वाचा आधारस्तंभ 'राष्ट्रीय हित', 'राष्ट्रीय विचार' यांना विसरत चालला आहे आणि माध्यमांची ही उदासीनता भारतामध्येच असेल तर मुळातच अलिप्तता जपणाऱ्या काश्मीर आणि काश्मिरींमध्ये असे विचार रुजवण्याचा प्रयत्नच अवास्तव नाही का? 


     उर्वरित भारतामध्ये बव्हंशी सामान्य माणूस हा मध्यममार्गी असतो. त्याचे राजकीय विचार जहाल नसतात. पण काश्मिरी माणसाच्या राजकीय भावना सर्वाधिक तीव्र असतात. याचा एक परिणाम म्हणून समजाचे नेतृत्व म्हणून केवळ राजकीय नेत्यांकडेच पाहिले जाते. समाजसेवा,संशोधन,कला,क्रीडा अशा क्षेत्रातील व्यक्तींकडे समाजाचे नेतृत्व म्हणून पाहिलेच जात नाही. दुखः या गोष्टीचे की प्रत्येक राजकीय नेतृत्व हे संधीचा आपल्या फायद्यासाठी उपयोग,एखाद्या घटनेचे स्वार्थासाठी भांडवल, शिफारशी यातच गुरफटून राहते; आणि सामान्य माणूस त्याच्या विकासापासून एक तर लांब राहतो किंवा विघातक मार्गाने आभासी विकासाचा एक भाग बनतो. मग असे असताना काश्मीरचे काम विस्तारण्याबाबत विचार करताना विधायक राजकीय नेतृत्व घडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे का?


     अर्थातच कोणत्याही दीर्घकालीन कामासाठी priority ठेवणं नेहमीच महत्त्वाचं. पण काश्मीरमधली परिस्थिती इतकी विलक्षण आहे की क्षणाक्षणाला बदलते; इतकी की दौऱ्याच्यावेळी रात्री ११-११:३० पर्यंत फिरताना ज्या लाल चौकाला शांत पहिले होते, तोच लाल चौक एका मोर्चादरम्यान अवघ्या १५ मिनीटात रक्तरंजित होतो. रस्त्यावर उतरून घोषणा देणारे, अर्धसत्य सांगून चिथावणारे नेते अशावेळी मूग गिळतात आणि पुढच्या संधीची वाट पाहत डोळ्यावर कातडं ओढून गप्प बसतात, आझादीची भाषा बंद पडते…या चक्रातून बाहेर कसे पडायचे? (या सगळ्या निराशेच्या काळ्या ढगाला सोनेरी किनार म्हणजे या प्रकारानंतर National Conference ने मोर्चा काढला, मोर्चाला प्रतिसादही चांगला होता. ज्यामध्ये दगडफेक थांबवून Separatists नी विकासात लक्ष घालावे अशी मागणी केली गेली . १९९६ नंतरचा हा अशा प्ररकारचा पहिला मोर्चा होता.)


     म्हणूनच काश्मिरमधल्या नाजूक परिस्थितीतून तेथील सामान्य माणसाला बाहेर काढायचे असेल, विकासाकडे न्यायचे असेल तर ते सहभागातूनच साधता येइल. आपल्याभोवती परिस्थितीने आणि जाणीवपूर्वक विणल्या गेलेल्या कोशाच्या बाहेर पडूनच त्याला बाहेरच्या जगाची जाणीव होईल आणि निरपेक्ष विचार करता येइल. परंतु तो आजही ज्यांच्यामागे धावत आहे असे काश्मीरचे नेते एकांगी विचार करत आहेत का? या विचारला सर्वसामान्यांचा पाठींबा मिळावा म्हणून विचारांमध्ये romanticism मिसळून परिस्थितीचा आभास निर्माण केला जात आहे का? आणि असे असेल तर या परिस्थितीतून सामान्यांना बाहेर काढण्यासाठी, त्यांना सारासार विचार करून 'विवेकी' आणि 'प्रगल्भ' बनवण्यासाठी, विकासाकडे प्रेरित करण्यासाठी नेमके कोणत्या दिशेने प्रयत्न करावे लागतील?


                                                                                       आपला,
                                                                                        सारंग गोसावी