Friday, May 5, 2017

आशा आणि नेतृत्वाच्या शोधतील काश्मीर खोरे
अचानक दिसणाऱ्या प्रत्येक मोठ्या बदलामागे घटनांची एक खूप मोठी साखळी दडलेली असते. ज्वालामुखीचा उद्रेक जरी अचानक होत असला तरी तो आधी आणि नंतरही किती काळ आतल्या आत धुमसतो आहे याच्याकडे  लक्ष देणे गरजेचे असते. उद्रेकाच्या आधीची शांतता ही जशी फसवी तशीच उद्रेकानंतरची राख ही वरवरची खपली असू शकते हेही तितकेच खरे.

काश्मीर खोऱ्यातील परिस्थितीने विविध माध्यमांमध्ये या आधीपेक्षा जास्त अशी जागा २०१६ च्या जुलै महिन्यापासून जी मिळवली ती विविध कारणांनी आजही कायम आहे. दुर्दैवाची गोष्ट एवढीच की यातली ९७% कारणे ही हिंसा, उद्रेक, द्वेष अशा नकारात्मक भावनांना अधोरेखित करणारी आहेत. त्यांचा योग्य वेळी योग्य प्रकाराने आढावा घेतला जाणे आणि त्यानुसार सर्वंकष विचाराने प्रतिवादी नव्हे तर प्रतिसादी कृती होणे गरजेचे आहे.

काश्मीर खोऱ्यातील सध्याच्या परिस्थितीला अनेकांकडून हिरीरीने अनेक साधर्म्याची ओळख जोडली जाते आहे. यातले सर्वाधिक साधर्म्य म्हणून १९९० च्या दशकातील परिस्थिती काश्मीर खोऱ्यात परत येते आहे असा विचार मांडला जात आहे. असे म्हणणाऱ्या प्रत्येकाने हे लक्षात घेतले पाहिजे की १९९० नंतर उलटलेली साधारण २० वर्षे, त्या दरम्यान घडून गेलेल्या विविध घटना, सामाजिक-आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात झालेले बदल, जागतिक राजकारणातील बदलले चेहरे आणि वारे, काश्मिरी नागरिकांच्या मनातील भावना व्यक्त करण्याची पद्धत या सगळ्याला सामावणारी आहेत. म्हणूनच ९० च्या दशकात एकजिनसी असणारी आझादी ची मागणी आता मात्र केवळ नावापुरती आणि लहान लहान घटकांच्या सहभागात विखुरलेली आहे. आणि म्हणूनच सध्याच्या परिस्थितीला ९०च्या दशकाशी तोलून त्यानुसार व्यूहरचना करून धोरण ठरवणे निव्वळ मूर्खपणाचे ठरेल.

जुलै २०१६ मध्ये काश्मीर खोऱ्याला आपला आवाज मोठा करण्यासाठी बुरहानच्या रूपाने एक चेहरा मिळाला. ज्याच्या त्यागाचे आणि शौर्याचे नायकपण अधिकाधिक मोठे करून काहीशा मरगळलेल्या मनांना उभारी देण्याचे काम केले गेले. या प्रतिक्रियांना मोजण्यामध्ये सत्ताकेंद्रांची झालेली चूक आता या काळात अतिरेकी बनण्यासाठी स्वेच्छेने सहभागी झालेल्या ४५ तरुण मुलांच्या रूपाने परिणाम साधत आहे. मात्र या परिणामाची खोली आपल्याला दिसते तेवढीच आहे का? या घटनांचे रंग जे उठून दिसतात तसेच आहेत का? या दोन प्रश्नांना मनात घेऊन नुकताच काश्मीर खोऱ्यात जाऊन आलो तेव्हा काही गोष्टी वेगळ्या जाणवल्या.

एका अतिरेक्याला मारल्याची वेदना सर्वाना सारखीच जाणवते आणि मग त्याला मलम लावण्यासाठी प्रत्येक जण आपल्याला जमेल त्या पद्धतीने सरसावतो - या प्रक्रियेत पहिले ६ महिने अशांत गेले. मात्र त्या मागची करणे जर तेवढीच मर्यादित असती तर ही परिस्थिती आताही अशांतच राहिली नसती. म्हणजेच केवळ ही भावना सोडून आणखी काहीतरी driving force या उद्रेकामागे आहे हे नक्की. खरे पाहता २०१४ साली  महापुराच्या संकटानंतर काश्मीर खोऱ्यातील सामाजिक आणि आर्थिक गणिते बदलली.  महापुराच्या वेळी सरकारकडून न मिळालेल्या योग्य मदतीच्या दुसऱ्या बाजूला धर्माच्या नावावर स्थापन झालेल्या काही संघटनांनी आपल्या सबलीकरणाचे भांडवल म्हणून वापरले. अस्मानी संकटाच्या वेळची सुल्तानी अकार्यक्षमता ही नवी आणि प्रभावी सत्ताकेंद्रे स्थापन करू शकते.  यंत्रणांबद्दलची असणारी निराशा अशा वेळी आणखी गडद होते. या महापुरावेळी काश्मीर खोऱ्याचे अर्थकारण जे गडगडले ते नंतर पुन्हा जागेवर आलेच नाही.

आर्थिक  हितसंबंधांच्या गुंत्याचा प्रभावही सामाजिक मानसिकतेवर पडत असतो. त्यामुळे सरकारी अकार्यक्षमता आणि संवेदनेच्या अभावातून सामान्य माणसे आणि सरकार यांच्यात एक दरी निर्माण झाली ज्याचा परिणाम राजकीय क्षेत्रावर उमटून पुढच्या निवडणुकीत सत्तांतर झाले पण त्यासाठी घडवून आणलेली  युती प्रथमपासूनच अनैसर्गिकतेचे लेबल लावून पुढे जात होती. PDP -BJP च्या युतीला सावरण्यासाठी सुरुवातीला मुफ्ती सईद यांचा चेहरा होता परंतु त्यांचे आजारपण आणि मृत्यूनंतर त्यांच्या राजकीय वारसाचे नाव ठरण्यासाठी लागलेला वेळ सामान्य नागरिकांसाठी सत्ताधाऱ्यांच्या निर्णय कौशल्यावर प्रश्नचिन्ह उमटवणारा होता. त्यातही जेव्हा मुफ्ती यांच्यानंतर नवे नेतृत्व म्हणून  मेहबूबा यांच्याकडे मुख्यमंत्रीपद देण्याचे निश्चित झाले तेव्हा पुराच्या संकटानंतर ज्या धार्मिक जहालवादी  संघटनेने लोकांची मने भरली होती अशा संघटनेकडून एका स्त्रीला मुख्यमंत्री म्हणून स्वीकारण्यासाठी छुपा विरोध सुरु झाला. या मुळातच अनैसर्गिक मानल्या गेलेल्या युतीच्या एकत्र संसाराचा हा दुसरा टप्पा सुरु होतो न होतो तोच जुलै २०१६ च्या घटनेने काश्मीर खोऱ्यातील विचारांना एक वेगळी कलाटणी दिली. या संपूर्ण परिस्थिती मध्ये राज्य सरकारचे न जाणवणारे अस्तित्त्व हे मुख्यमंत्री पदासाठीच्या मेहबूबा यांच्या कार्यक्षमतेवर आधीच ठेवलेले प्रश्नचिन्ह खरे करणारे होते. त्यामुळे जवळपास ९० पेक्षा जास्त सामान्य माणसांचा मृत्यू, १३,००० लोकांचे जखमी होणे पैकी १००० तरुण मुलांना आलेले संपूर्ण किंवा बव्हंशी अंधत्व, ७००० लोकांवर झालेल्या प्रतिबंधात्मक कारवाया आणि साधारण १०००० करोड रुपयांचा बुडालेला व्यापार आणि धंदा यासाठी सरळसरळ मुख्यमंत्रांच्या याच अकार्यक्षमतेला जबाबदार धरले गेले. या सर्व घटनांमधून तयार झालेली असुरक्षिततेची भावना या संपूर्ण नाट्याचा आत्मा म्हणून वावरते आहे. यातूनच ज्यांना आपले भविष्य दिसत नाही अशा मनाने हरलेल्या आणि आशावाद सोडलेल्या तरुण मुलांसाठी दिसेल तो मार्ग पत्करण्याचा पर्याय उभा राहिला. २००३ ते २००७ च्या दरम्यानचा शांतता परत आणण्याच्या सुवर्णकाळाला उर्वरित भारताने गमावल्याचा हा परिपाक होता.

याला जोड म्हणून काश्मीर खोऱ्याच्या आर्थिक प्रगतीमध्ये महत्त्वाचे स्थान असणारा पर्यटनाचा उद्योग भारतविरोधी भूमिका घेणाऱ्या काश्मीर मध्ये उभा राहू द्यायचा नाही या उर्वरित भारतात होणाऱ्या प्रचारामध्ये अडकला. अर्थातच हा प्रचार काश्मीर खोऱ्यापर्यंतही पोहोचला ज्याचे पर्यवसान दोन भागांमधील दरी आणखी मोठी होण्यात झाले. यात भर म्हणून दोन्ही बाजूच्या माध्यमांकडून द्वेष आणि निराशेने भरलेली माहिती लोकांपर्यंत पोहोचल्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली. यातूनच नव्या लोकांनी बंदुकीचा पर्याय स्वीकारून लढायला सुरुवात केली. आणि म्हणूनच JKLF चे माजी नेतृत्त्व अमानुल्ला खान यांच्यासाठी जरी 'आतंकवाद नव्हे तर संघर्ष गरजेचा' असला तरी लोकांनी मात्र पहिला रस्ता स्वीकारला.

काश्मीर खोऱ्याचे आपल्यापर्यंत पोहोचणारे सगळे चित्रीकरण खरेच आहे. मात्र आपण हेही लक्षात घेऊ की याचा अर्थ असा होत नाही की केवळ एवढेच चित्रीकरण खरे आहे. सध्या काश्मीर खोऱ्यात फिरून सामान्य नागरिक, पोलीस, सैन्यदले, दगडफेक करणारे अशा अनेकांशी संवाद साधताना अशा अनेक गोष्टी पुढे आल्या की ज्या कोणत्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. ज्यावेळी श्रीनगर आणि सोपूर च्या भागातील हिंसक झडपांची चित्रे आपल्या पर्यंत पोहोचतात त्यावेळी केरन, उरी आणि गुरेझ सारखे काश्मीर खोऱ्यातले अगदी ताबारेषेजवळचे भाग पोहोचत नाहीत जिथे इतक्या वर्षात एकदाही दगडफेक तर दूरच पण कधी भारतविरोधी साधा आवाजसुद्धा उठलेला नाही. ज्यावेळी तरुण मुलामुलींचे दगड फ़ेकतानाचे आणि नारे देतानाच फोटो आपल्यापर्यंत येतात तेव्हा आपल्याला हे समजत नाही की 'Peace Cycle Rally' मध्येही बहुसंख्येने तरुण सहभागी झाले होते, Khelo India साठी प्रतिसाद उत्स्फूर्त होता आणि मुलींचा एक गट NCC मध्ये सहभागी होऊन १५ दिवस शिबिरासाठी बेंगलोरला येतो आहे. त्यामुळे आपल्यापर्यंत काश्मीर खोऱ्यातील येणाऱ्या प्रतिमा या कायमस्वरूपी आणि सर्वव्यापी आहेत असे न म्हणता त्या ठराविक भागापुरत्या आणि त्याही ठराविक वेळेपुरत्या मर्यादित आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे या तथाकथित चळवळीचे भांडवल हे तरुण मुलांच्या मनातील राग असून जो व्यक्त होण्यासाठी योग्य जागा न सापडल्याने मिळेल त्या वाटेने बाहेर पडतो आहे.


अर्थातच माझे असे म्हणणे अजिबात नाही की या परिस्थितीमध्ये कोणताच धोका नाही. चालू हिंसक आंदोलनाची पातळी आणि स्वरूप यांचे भविष्य ठरवण्याचा निर्णय काश्मिरी जनताच घेईल आणि त्यांच्या निर्णयावर या चळवळीचे भविष्य अवलंबून असेल. आणि दुसरे म्हणजे तरुण पिढीसमोरची निराशा जर लवकर हटली नाही तर ISIS सारख्या धर्मांध आणि धोकादायक शक्तींचा प्रवेश काश्मिरी गुंत्यामध्ये होईल जो या चळवळीचे स्वरूप अतिशय गंभीर बनवणारा असेल.

म्हणूनच सध्या लगेच गरज आहे ती देशाच्या नेतृत्वाकडून येणाऱ्या एका आशादायी आणि भरीव अशा धोरणाची, काश्मिरी गुंत्यातील सर्व भागधारकांना एकत्र बसवून चर्चा घडवून आणण्याची, लोकांच्या आंदोलनांना हाताळण्याच्या अधिक मानवी उपायांची, Private Public Partnership च्या माध्यमातून स्थानिकांना भागधारक बनवून विकासाच्या दिशेने पुढे जाण्याची, काश्मीर खोऱ्याप्रमाणेच उर्वरित भारतीयांकडून होणाऱ्या Social Media च्या वापरावर बंधने आणण्याची आणि त्याचवेळी शस्त्राला तितक्याच कणखरपणे शस्त्राने उत्तर देण्याची! यावेळचे काश्मिरींचे आंदोलन हे दिसताना जरी हिंसक आणि एकसंध दिसत असले तरी नीट लक्ष देऊन पाहता ते तसे नाही. त्यामुळे केवळ सैन्याच्या बळावर नव्हे तर या प्रत्येक मुद्द्याला एकाच वेळी सामान महत्त्व देऊन या प्रत्येक पातळीवर काम केले तर आशा आणि नेतृत्त्वाच्या शोधतील काश्मीर खोऱ्याला योग्य दिशा मिळेल!!


-सारंग गोसावी

    

No comments:

Post a Comment