Sunday, March 10, 2013

पत्र दुसरे: मानसिकता


मानसिकता 

काही महिन्यांपूर्वी काश्मीरमध्ये शोपियानमध्ये दोन मुलींवर जो अन्याय झाला त्याचा विरोध करण्यासाठी, निषेध आणि चीड नोंदवण्यासाठी संपूर्ण समाज पेटून उठला आणि जवळजवळ दोन महिने काश्मीर बंद होते. समाजात घडणार्या एखाद्या घटनेला प्रतिक्रिया देणार्या 'जिवंत समाजा'त आपण काम करतो आहोत याचा थोडासा दिलासा होता. पण म्हणून प्रतिक्रीया देण्यासाठी वापरलेला दगडफेकीचा मार्ग नक्कीच चुकीचा होता.


बजबिहाराचा युवक गट -काश्मीरचा युवक विभाग रात्री एकत्र जमलेला असताना शोपियानचा विषय  निघाला. त्यातील दोघांनी दगदफेकीत सहभाग घेतला होता; ''दादा, आप हमेशा कहते हो की अच्छा काम करना चाहीए, हमने इस बार करके दिखाया''असे त्या दोघांचे म्हणणे. तर त्यांच्यापैकी एकाच्या मते हा सर्व प्रकार म्हणजे राजकीय डाव आहे. त्यांच्याशी नंतर बोलताना मी त्यांना असे सांगितले की ''असीम जेवढा सक्रीय सहभाग घेते तेवढाच विचाराने सहभाग घेते.दगडफेक साधारणत: दोन प्रकारे होते )निश्चित कारणासाठी) आणि ) लोकांना फक्त प्रभावित करण्यासाठी गरज नसताना वापरलेले साधन म्हणून. शोपियान नंतरची दगडफेक दुसर्या प्रकारची होती. दगडफेकीने साध्य काय झाले? त्या दोघींना न्याय  मिळाला का? उलट आज दोन महिन्यांनंतर समाजाला या गोष्टीचा विसरही पडला...काश्मीर पोलिस आर टी आय अंतर्गत येतात, तेव्हा झाल्या प्रकारानंतर RTI चा वापर करून प्रशासनाची माहितीची मागणी करणं आणि लोकांपर्यंत अशी माहिती पोहोचवण्याचं काम शेवटपर्यंत झालं पाहिजे...'' या चर्चेनंतर गटातील एकाने शोपियानच्या DC आणि DIG ना एक पत्र पाठवले, त्यांच्याकडून काहीच महिती मिळाली नाही. तरी याचा पाठपुरावा करणे चालू आहे.

परंतु काश्मीरमधील एकंदर मानसिकताच वेगळी आहे. बंड शांतीपूर्ण मार्गाने अथवा आक्रमक पद्धतीने करण्यामध्ये एक पुसटशी रेषा आहे. कारण- मानसिकता. उदाहरणच द्यायचे तर स्वाईन फ्लू जेव्हा सुरुवातीला पसरत होता तेव्हा घाबरून जाऊन सर्वांनी मास्कस चढवले होते. पण जेव्हा रोजचेच झाले तेव्हा सोडून दिले. अगदी तसेच त्यांना आता आर्मी ची भीती वाटत नाही. असेही मारणार आणि तसेही मारणारच...

एक घटना आठवते. २००४ ला काश्मीरला भूकंपाचा मोठा धक्का बसला. भूकंप होत असताना आम्ही सगळेच घाबरून आपापल्या गाड्यांमधून उतरून हायवे वर आडवे झालो. तेव्हा हायवे रिकामा ठेवण्याची जबाबदारी असलेला एक जवान तेथे आला आणि आम्हाला रस्ता रिकामा करा, उठा, असे ओरडू लागला. तेव्हा त्याने रोखलेल्या बंदुकीसमोर सगळा काश्मीरी जमाव निडरपणे उभा राहिला. कारण परिस्थितीचा विचार न करता तो आपल्या शक्तीचा गैरवापर करत होता, त्यामुळेच माझ्याबरोबर असलेले सर्व काश्मीरी त्याच्यावर संतापले होते. तेव्हा मी मध्यस्थी करून वरिष्ठांना सर्वांची माफी मागायला लावल्यावर सर्वजण शांत झाले. थोडक्यात काय, तर कोणाच्याही सहन करण्याच्या आणि शांत राहण्याच्या क्षमतेवर मर्यादा असतात हे लक्षात घेतले पाहिजे.

गेली २० वर्षे काश्मीरी माणूस अशांतता, हिंसा, मृत्यू, बेभरवशाच्या छायेत वावरतो आहे. गेली २० वर्षे सकाळी बाहेर पडल्यानंतर संध्याकाळी घरी परतण्याची खात्री आणि शाश्वती त्याला देता येत नाही. गेल्या २० वर्षात सामान्य काश्मीरी मुलाच्या शिक्षणात सातत्य राहू शकलेले नाही. गेल्या अनेक पिढ्या प्रत्येक काश्मीरीला 'अतिरेकी' असण्याच्या संशयानेचबाहेर सर्वत्र पाहिले जाते...तर मग अशा समाजाकडून 'योग्य निर्णय' घेण्याची अपेक्षा कितपत ठेवावी? त्यांच्याशी कोणत्याही प्रकारे संवाद न साधता, त्यांना जाणून न घेता त्यांच्याकडून शांततापूर्ण मार्गांची अपेक्षा करणं ही चूक होत नाही का?

No comments:

Post a Comment