Sunday, March 10, 2013

पत्र तिसरे : संवाद, नाती आणि एकात्म भाव



 संवाद,  नाती आणि एकात्म भाव 


आजच मी माझ्या भाषणामध्ये मांडल्या जाणार्या काही मुद्द्यांचा विचार करत होतो. तेव्हा आझम इन्कीलाबी बरोबर झालेल्या भेटीचा संदर्भ आठवला. आझम इन्कीलाबी हा काश्मीर खोर्यातील पहिला दहशतवादी म्हणून ओळखला जातो. त्याच्याशी झालेल्या भेटीदरम्यान 'दहशतवादी कसा घडतो?' याबाबतीत चर्चा झाली होती. त्याने दहशतवादी घडण्याच्या काही पायर्या सांगितल्या होत्या. त्याच्या मते-अधिकारांपासून आणि न्याय्य संधींपासून वंचित राहिलेल्या गटाची पहिली पिढी नेहमीच आपल्या न्याय्य आणि समान संधींच्या मागणीसाठी शांततेने मोर्चे काढते, विनम्रतेने अन्याय नष्ट करण्यासाठी अर्ज-विनंत्यांचा मार्ग अवलंबते. पण या मोर्चांना आवर घालण्यासाठी , विरोधाचा आवाज दडपून टाकण्यासाठी सरकार बळाचा वापर करते. पहिल्या पिढीचा दडपला गेलेला आवाज पाहून दुसरी पिढी 'केवळ शांततेने काही मिळणार नाही' या अनुभवाने हिंसेचा मार्ग स्वीकारते. परंतु दुसर्या पिढीच्या हिंसेमध्ये अनेकदा त्यांच्या स्थानीय बांधवांचाच बळी जातो. त्यामुळे लढा देणारी तिसरी पिढी असा विचार करते, की 'निर्णय घेणारे दिल्लीत आहेत. त्यामुळे जोपर्यंत त्यांच्या कानापाशी आवाज होणार नाही तोपर्यंत त्यांना जाग येणार नाही.'त्यामुळेच ही तिसरी पिढी हिंसेचा मार्ग पत्करून आपल्या घरापासून लांब असलेल्या सरकारला जागे करण्यासाठी दिल्ली, मुंबई, बेंगलोर सारख्या ठिकाणी बाँबस्फोट घडवून आणते. आपल्या मागण्या शांततेने मांडणारी पहिली पिढी, दबावशाहीला तेवढेच सक्षम उत्तर देण्यासाठी हातात बंदूक घेतलेली दुसरी पिढी आणि आपला आवाज दूरपर्यंत पोहोचवण्यासाठी अधिकाधिक हिंसक बनलेली तिसरी पिढी असे दहशतवादाचे चक्र!

या तिसर्या टप्प्यापर्यंत पोहोचता पोहोचता गोष्टी एवढ्या गुंतागुंतीच्या होतात की त्याचे स्वरूप भयावह आणि उकल न करता येण्याजोगे वाटू लागते. परंतु याच सगळ्या चक्राला आपण थोडे सोपे केले तर दहशतवादाच्या सुरुवातीचे साधे-सरळ चित्र दिसते, ते असे-समाजामध्ये नेहमीच खालचा आणि वरचा वर्ग असतो. सत्ता, संपत्ती, परंपरेच्या जोरावर एक वर्ग दुसर्या वर्गावर हुकुमत गाजवत असतो. त्यामुळेच विकासाचा असमतोल तयार होतो . आणि दोन्ही वर्गांमधील दरी वाढत जाते. म्हणजेचा खालचा वर्ग आपली स्थिती सुधारण्यासाठी आणि सर्वच बाबतीत betterment साठी वरच्या वर्गाचा विरोध करू लागतो. हा विरोध नोंदवण्यासाठीचे मार्ग वेगवेगळे असतात. याच विरोधाचे पुढचे गुंतागुंतीचे स्वरूप म्हणून 'दहशतवाद' तयार होतो. कोणीही दहशतवादी जन्मत:च तसा नसतो. त्याच्या आजुबाजूची परिस्थिती त्याला तसे बनवते आणि त्यातून हिंसेचे न संपणारे चक्र सुरू होते.

काश्मीरमध्ये आत्ता चालू असणारे काम हे केवळ 'विकासासाठी केलेले तांत्रिक बदल' नाहीत. तर तो एक विचार आहे;आणि काश्मीर ही एक चळवळ आहे जिथे 'सामान्य माणूस' महत्त्वाचा आहे. म्हणूनच दोन्ही भागांमधील खासकरून ऊर्वरीत भारतामधील लोकांमध्ये असणारी उदासीनता कमी करून त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी हे पत्र लिहिले आहे.

मागच्या पत्राच्या अखेरीस मी अपेक्षा आणि संवाद यांच्या बाबतीत लिहीले आहे. मला नक्की काय म्हणायचे आहे याचा खुलासा करण्यासाठी एक उदाहरण देतो-समजा तुम्ही रस्त्यावरून चालला आहात, एक अनोळखी माणूस तुम्हाला मध्येच हटकतो आणि सांगतो की, ''अरे दापोड्यामध्ये जरा कामाची गरज आहे. आपल्याला तिथे जाऊन काम करायचं आहे.' त्याच्या या सांगण्यानंतरची आपली प्रतिक्रीया 'तू कोण सांगणारा?' अशीच असेल. खरे पाहता त्याचा हेतू चांगलाच असेल. पण त्याची अप्रोच होण्याची पद्धत त्याच्या हेतूला पोहोचवण्यासाठी निरुपयोगी असेल. उलट जेव्हा असे काही सांगणारा माणूस या ना त्या मार्गाने तुमच्या ओळखीचा असेल तेव्हा आपण त्याने सांगितलेली गोष्ट करू वा ना करू ; पण किमान त्या गोष्टीचा 'विचार' करू.गेली ६० वर्षे काश्मीरमध्ये अगदी असेच होत आहे. काश्मीरी माणूस कसा आहे, त्याचे प्रश्न काय आहेत, विचार काय आहेत (मानसिकता), काश्मीरी माणसाने कसे वागावे या बाबतीतल्या कोणत्याही परिस्थितीची कल्पना नसताना, स्वत:च गोष्टी कन्सिडर करून बनवलेल्या आडाख्यांवर आपण घरबसल्या शिक्कामोर्तब केले आहे. खरी परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्नच केला नाही. ६० वर्षांच्या या संवादाच्या अभावामुळे आणि याचा फायदा घेऊन पसरवल्या गेलेल्या गैरसमजांमुळे दोन्ही मनांमध्ये खूप मोठी दरी तयार झाली आहे. ६० वर्षांची ही मोठी दरी कमी करण्यासाठी 'विकास' आणि 'संवाद' वापरून नाती जोडणे हा मार्ग योग्य आहे का? आपणास काय वाटते?

No comments:

Post a Comment